खालील वाक्ये पाहा.
१. रमेशने भाजी आणली.
२. अमोल अभ्यास करील.
३. मंत्र्यांचे भाषण संपले.
४. स्पर्धक धावतात.
५. मिरवणूक येईल.
येथील आणली, करील, संपले, धावतात, येईल हे शब्द वाक्यात कोणती क्रिया चालली आहे हे सांगतात. आणखी एक पाहा की जर हे क्रियादर्शक शब्द वाक्यात नसतील तर त्या वाक्यांचा अर्थ पूर्ण होत नाही. रमेशने भाजी….., अमोल अभ्यास स्पर्धक म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी क्रियादर्शक शब्दाची जरुरी आहे.
जरा बारकाईने पाहिले की आणखी एक वैशिष्ट्य आढळते, ते म्हणजे या क्रियादर्शक शब्दांमध्ये लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे विकार (बदल) होत आहे. भाजी आणली, भोपळा आणला, भाषण संपले भाषणे संपली, तू आलास तुम्ही आलात म्हणजे क्रियादर्शक शब्द विकारी शब्द आहे.
म्हणून वाक्यातील क्रिया दाखविणाऱ्या आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दास क्रियापद असे म्हणतात.
धातू : क्रियापदातील जो मूळ शब्द त्याला धातू असे म्हणतात. उदा. खा, कर, बस, पळ, वाच, रड वगैरे शब्द धातू आहेत. या धातूंना प्रत्यय लागल्यावर त्यांचे क्रियापद बनते. जसे- खाणे, खातो, करणे, करतात, करेन, बसणे, पळणे, वाचणे, वाचते, रडले वगैरे.
कर्ता: वरील वाक्यांत भाजी आणण्याची क्रिया कोणी केली तर रमेशने, धावण्याची क्रिया कोणी केली तर स्पर्धकाने, येण्याची क्रिया कोण करणार तर मिरवणूक, असे समजते. म्हणजे क्रिया करणारा जो शब्द त्याला कर्ता असे म्हणतात.
कर्म: वरील वाक्यात आणण्याची क्रिया कोणावर घडली तर भाजीवर, करण्याची क्रिया अभ्यासावर हे स्पष्ट होते. यावरून कर्त्याशिवाय क्रिया ज्या गोष्टीवर घडते ते दाखविणारा शब्द म्हणजे कर्म होय.
साधारणपणे क्रियापदास कोण असा प्रश्न विचारला असता कर्त्याचे उत्तर सापडते व काय असा प्रश्न विचारला असता कर्माचे उत्तर मिळते. वाक्यात कर्म आहे की नाही यावरून क्रियापदाचे दोन प्रकार पडतात.
१. सकर्मक क्रियापद :
१. कपिलने चेंडू तडकावला.
२. दुकानदाराने दिनदर्शिका दिली.
येथील वाक्यात चेंडू व दिनदर्शिका हे शब्द कर्म आहेत. क्रियापदास येथे कर्म असल्याने अशा क्रियापदास सकर्मक क्रियापद असे म्हणतात.
२. अकर्मक क्रियापद :
१. वारा वाहतो.
२. स्टेशनवरून आताच गाडी गेली.
येथील वाक्यात पाहणे व जाणे ह्या क्रियापदांचा परिणाम फक्त कर्त्यावर होतो आहे. येथील क्रियापदांना कर्म नाही म्हणून अशा क्रियापदांस अकर्मक क्रियापदे असे म्हणतात. क्रियापदांचे आणखी काही प्रकार
१. अकर्तृक क्रियापद :
१. त्याच्या मनात कळवळले.
२. चांगलेच उजाडले.
३. सायंकाळी मला करमते.
४. मला मळमळते.
वाक्यात कमीत कमी कर्ता व क्रियापद असावे लागते. मग येथे कर्ता कोण आहे ? कळवणारे कोण ? उजाडणारे कोण ? करमणारे कोण ? क्रिया तर घडते आहे पण कर्ता सापडत नाही. काही क्रियापदे अशी असतात की त्यांचा अर्थ त्यांच्यामध्येच पूर्ण असतो. अशा क्रियापदांना कर्ता व कर्मही नसते. कर्त्याचे काम स्वतः क्रियापद करते. अशा क्रियापदास अकर्तृक क्रियापद असे म्हणतात.
२. सहायक क्रियापद
१. आम्ही गप्पा मारीत असू.
२. मला प्रशस्तीपत्र मिळत आहे.
३. मुलगा जमिनीवर रांगत होता.
४. सुरेश भाषण देत आहे.
या ठिकाणी प्रत्येक वाक्यात दोन दोन क्रियापदे सापडतात. पहिल्या वाक्यात खरे म्हणजे गप्पा मारण्याविषयी सांगावयाचे आहे तीच क्रिया मुख्य आहे; पण केवळ आम्ही गप्पा मारीत असे वाक्य पूर्ण अर्थ व्यक्त करीत नाही. तोच अर्थ पूर्ण करण्यासाठी असू या आणखी एका क्रियापदाने मदत केली. यावरून असे दिसते की, कधी कधी वाक्यातील मुख्य क्रियापदास मदत करणारी काही क्रियापदे येतात. म्हणून वाक्यातील मुख्य क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जी क्रियापदे मदत करतात त्यांना सहायक क्रियापदे असे म्हणतात. सहायक क्रियापद नेहमी मुख्य क्रियापदाच्या पुढे येते.
३. संयुक्त क्रियापद :
१. पाहुणे काल तर येणार होते.
२. एका बैठकीत गुरुचरित्र वाचून काढले.
३. मी पत्र लिहून दिले.
४. मुलांनी दूध पिऊन टाकले.
या ठिकाणी येणार ही मुख्य क्रिया असून होते हे सहायक क्रियापद आहे. वाचून ही मुख्य क्रिया असून काढले हे सहायक क्रियापद आहे. म्हणजे येथे मुख्य क्रियापद व सहायक क्रियापद मिळून एक जोड क्रियापद तयार होते. जेव्हा मुख्य क्रियापद व सहायक क्रियापद एकत्र येऊन एक जोड क्रियापद तयार होते तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात.
४. शक्य क्रियापद :
१. मला बोलवत नाही,
२. त्याला हे सर्व बघवते.
३. हमालास काम करवते.
४. कसे हो तुमच्याने हे टाकवते ?
येथील जाड टाईपमधील क्रियापदे पाहा. या क्रियापदांवरून ती क्रिया करणे कर्त्याला शक्य आहे असा बोध होतो. त्यातून शक्यता निर्माण होते. म्हणून जी क्रियापदे कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्ती आहे असे दाखवतात त्यांना शक्य क्रियापद असे म्हणतात.
५. प्रयोजक क्रियापद
(अ) | (ब) |
---|---|
१. विद्यार्थी बसतात. | १. अध्यापक विद्यार्थ्यांना बसवितात. |
२. घोडा पळाला. | २. टांगेवाल्याने घोड्यास पळविले. |
३. मी लिहितो. | ३. अध्यापक माझ्याकडून लिहवितात |
दोन्ही विभागांतील क्रियापदे पाहिल्यावर असे दिसेल की दुसऱ्या विभागातील क्रियापदांचे स्वरूप वेगळे आहे.
३. मी लिहितो.
पहिल्या भागातील कर्ते स्वतः क्रिया करीत आहेत. दुसऱ्या विभागातील कर्ते स्वतः क्रिया न करता दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेरणेने ती क्रिया करतात. पहिल्या भागात बसण्याची क्रिया विद्यार्थी करतात; पण तेच विद्यार्थी अध्यापकाच्या प्रेरणेने क्रिया करतात. म्हणून क्रिया दुसऱ्याच्या प्रेरणेने जेव्हा घडत आहे असे दिसते तेव्हा त्या क्रियापदास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.
६. साधित क्रियापद :
१. स्वतःची स्तुती ऐकताच तो शरमला.
२. संपाची तीव्रता आता थंडावली.
३. आईच्या प्रेमास तो दुरावला.
४. शक्ती येऊन मला आता उठवते.
या ठिकाणी शरमला हे क्रियापद शरम या नामापासून, थंडावला हे क्रियापद थंड या विशेषणापासून दुरावला हे क्रियापद दूर या अव्ययापासून आणि उठवते हे क्रियापद ऊठ या धातूपासून बनलेले आहे म्हणून जे क्रियापद दुसऱ्या नामावरून विशेषणावरून, अव्ययावरून व धातूवरून काही प्रत्यय लागून तयार होते त्याला
साधित क्रियापद असे म्हणतात. फेसाळणे, सुखावणे, उद्धारणे, नादावणे, आखडणे, उभारणे, खदखदणे, चकचकणे, सारवणे, नेववणे, विझवणे वगैरे क्रियापदे या प्रकारची होत. दुसऱ्या शब्दावरून बनलेली म्हणून त्यास साधित असे म्हणतात. ७. अनियमित क्रियापद : मराठीमधील काही धातूंची भूतकाळची रूपे इतर
धातूप्रमाणे होत नाहीत. ती जरा निराळ्या पद्धतीने होतात. आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको ही रूपे अशा प्रकारची होत.
नियमितपणे चालणारे धातू-बांध-बांधले, चोर-चोरले, बोल-बोलतो, हस-हसेल इ. अनियमित धातू-कर-केले, जा-गेले, या-आले इ.