क्रियाविशेषण अव्यय व प्रकार मराठी व्याकरण

१. क्रियाविशेषण अव्यय

खालील वाक्ये पाहा:
१. सर्व लोकांनी तेथे बसावे.
२. तुम्ही तिकडे काय करीत आहात
३. चोहीकडे पाणीच पाणी पसरले.
४. तो घरी अचानक आला.
येथील तेथे, तिकडे, चोहीकडे, अचानक हे शब्द अव्यये आहेत. कोठे बसावे ? तेथे कोठे करीत आहात ? तिकडे, कसा आला ? अचानक, तेथे, तिकडे, चोहीकडे अचानक हे शब्द क्रियापदाबद्दल काही विशेष माहिती देतात. म्हणून क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दास क्रियाविशेषण असे म्हणतात.

क्रियाविशेषणाचे काही प्रकार खालीलप्रमाणे :

१. कालवाचक : आज, उद्या, नेहमी, मग, आता, पूर्वी, अचानक, वारंवार इ.

२. स्थलवाचक : येथे, तेथे, सभोवार, चोहीकडे, दूर, लांब, मागे, जवळ, वर, खाली इत्यादी.
३. परिमाणवाचक: अत्यंत, थोडे, फार, एकदा, अती, पुष्कळ, खरोखर, वाजवी, किंचित, जरा इत्यादी.
४. रीतिवाचक : असे, फुकट, पटकन, खचित, सहज, आपोआप, कदाचित इ.
५. प्रश्नार्थक : कोठे, केव्हा, कधी, का, काय इत्यादी.

२. शब्दयोगी अव्यय
पुढील वाक्ये पाहा :
१. सभेमध्ये दंगल झाली.
२. तुमचे अभ्यासाकडे लक्ष दिसत नाही.
३. घराजवळ विहीर आहे.
४. प्रेमापुढे पैशाची किंमत नसते. येथील वाक्यांतील मध्ये, कडे, जवळ, पुढे हे शब्द अव्यये आहेत. यांच्या रूपात काहीही बदल होत नाही. ही अव्यये एखाद्या शब्दास जोडून आलेली आहेत आणि ही अव्यये त्या शब्दास जोडली जाताना त्या मूळ शब्दांमध्ये काही फरक झालेला आहे. जसे सभा- सभेमध्ये, अभ्यास अभ्यासाकडे इ. ही अव्यये शब्दास जोडल्यामुळे त्या शब्दांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध पण स्पष्ट होताना दिसून येईल. म्हणून जे अव्यय नाम वा इतर त्यासदृश शब्दास जोडून येते व वाक्यातील इतर शब्दांशी संबंध स्पष्ट करते त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आत, पुढे, अगोदर, नंतर, पूर्वी, समोर, अलीकडे, खालून वरून, पुरता, साठी, उलट, शिवाय, प्रमाणे, कडे, समक्ष, ऐवजी, निमित्त, विषयी, जोगा, समान वगैरे शब्दयोगी अव्यये होत.

३. उभयान्वयी अव्यय
पुढील वाक्ये पाहा:
१. राम आणि सीता वनवासास गेली.
२. गोंधळ चालू आहे पण त्याचे काम थांबत नाही.
३. पेरू किंवा केळे यापैकी एक मिळेल.
४. घाईने पळाला म्हणून घसरून पडला.
येथील आणि, पण, किंवा, म्हणून हे शब्द अव्यय आहेत. आणि, किंवा या अव्ययांनी दोन शब्द जोडले आहेत. तर, पण, म्हणून या अव्ययांनी दोन वाक्ये जोडली आहेत. म्हणून जे अव्यय क्रियेचे वैशिष्ट्य न दाखवता दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडते त्या अव्ययास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
१. समुच्चयबोधक आणि आणखी, नू, अन्
२. विकल्पबोधक अथवा, अगर, या, किंवा वा
३. कारणबोधक: कारण, की, का,
४. संकेतदर्शक: जर तर, यथापि तथापि, म्हणजे की
५. परिणामबोधक: तेव्हा, वास्तव, म्हणून, सबब
६. स्वरूपवाचक म्हणून, म्हणजे, की
७. न्यूनत्वबोधक पण, परंतु, किंतु,

४. उद्गारवाचक अव्यय

पुढील वाक्ये पाहा:
१. अरेरे ! फार वाईट बातमी.
२. छट् ! आपण नाही येणार.
३. अहाहा! किती सुंदर चित्र, येथील अरेरे, छट्, अहाहा
हे शब्द अव्यय असून आपल्या भावना, दुःख, तिरस्कार,
आनंद व्यक्त करीत आहेत. म्हणून जे अव्यय मनातील दुःख, आनंद, तिरस्कार इ. प्रकारच्या भावना स्पष्ट करते त्यास उद्गारवाचक किंवा केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उद्गारवाचक अव्ययाचे प्रकार :

१. हर्षबोधक वा, वाहवा, धन्य, शाबास, ओहो इ.
२. शोकबोधक : अरेरे, रामराम, हायहाय, देवारे इ.
३. आश्चर्यबोधक: अबब, अरे बापरे, अगाई इ.
४. होकार दर्शक: होय, ठीक, बरं इ.
५. तिरस्कार दर्शक : छी; हट्, छद, थू, भलतेच इ.
६. संबोधन दर्शक : अहो, अरे, अग इ.
७. विरोध दर्शक: अहं, ऊंहू, छट् इ.

Leave a Comment