नाम विचार मराठी व्याकरण | naam vichar Marathi Vyakaran

 

नाम विचार मराठी व्याकरण | naam vichar Marathi Vyakaran

खालील वाक्ये पाहा :

१. विभावरी खेळावयास गेली आहे.

२. लहान मुलांना खेळणी आवडतात.

३. काश्मीरचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

४. कधीही लबाडी करू नये.

५. हवा फार सुंदर पडली आहे.

६. व्रात्यपणा सोडलास तर काय होईल ? 

७. गोविंदाला आंधळेपण आले आहे.

या वाक्यांतील विभावरी, मुलांना, काश्मीरचे सौंदर्य, लबाडी, हवा, व्रात्यपणा, गोविंद, आंधळेपण हे शब्द दृश्य किंवा अदृश्य वस्तूंचा बोध करून देतात.. व्याकरणात प्रत्येक गोष्टीला वस्तू म्हटले जाते. टेबल, चित्र, हिमालय, हवा, मुकेपणा,

रमेश, बाळू, सौंदर्य इ. साऱ्या वस्तूच आहेत. काही दृश्य आहेत, काही अदृश्य आहेत.

या वस्तूंना नाम असे म्हणतात. आपण ज्यांच्याविषयी विचार करतो त्या दृश्या अदृश्य वस्तूंचे नाव दाखविणाऱ्या शब्दांना नाम असे म्हणतात.

नाम हा विकारी शब्द आहे. लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे त्यात बदल होत जातो. उदा. पुस्तक पुस्तके, स्त्री- स्त्रियांनी, नदीत नद्यांमध्ये, राजवाडा राजवाडे इत्यादी.

नामाचे प्रकार

९. सामान्य नाम (पुढील उतारा पाहा. ) : ” गावात मोठी सर्कस आली होती. स्त्री, पुरुष, मुलांनी तेथे खूप गर्दी केली. सर्कसमध्ये वाघ, सिंह, हत्ती वगैरे प्राण्यांचे खेळ फारच सुंदर होते. दोन मोरांचे नृत्य आणि काकाकुवाचा संवाद ऐकून आश्चर्य वाटले. सर्कस सुटल्यावर समोरच्या बागेत ज फेरफटका मारला. येथील गुलाब, मोगरा, जाई, जुई वगैरे फुलांनी मन आकर्षून घेतले.

यातील स्त्री, पुरुष, मुले वगैरे शब्दांवरून माणसाच्या जातीचा बोध होतो. वाघ, सिंह, हत्ती या शब्दांवरून प्राण्यांचा बोध होतो. मोर, काकाकुवा या शब्दांवरून पक्ष्यांची जात समजते. या प्रत्येक वस्तूवरून त्या त्या जातीचा बोध होतो. नदी सर्व प्रकारच्या पाण्याच्या प्रवाहास म्हणतात. गाव प्रत्येक वस्ती केलेल्या भागास म्हणतात. म्हणून एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास सामान्य नाम असे म्हणतात.

२. विशेष नाम : 

पुढील वाक्ये पाहा : 

१. कोलकता फार गर्दीचे शहर आहे.

२. आज वर्गात डोईफोडे हे नवीन शिक्षक आले.

३. भारतात हिमालय हा सर्वात उंच पर्वत होय. 

४. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीची सुटी आली.

येथे कोलकता हे अनेक शहरांपैकी एक विशिष्ट शहर आहे. डोईफोडे हे माणसामधील विशिष्ट माणूस. हिमालय हा अनेक पर्वतांपैकी विशिष्ट पर्वत, नोव्हेंबर हा अनेक महिन्यांपैकी एक विशिष्ट महिना आहे. म्हणजे येथे एका ठरावीक वस्तूला विशिष्ट नाव दिलेले आहे. जेन्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास विशेषनाम असे म्हणतात.

३. भाववाचक नाम: 

खालील वाक्ये पाहा :

१. सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमान वाटतो.

२. रस्त्याने जाताना सावधगिरीने जावे.

३. सर्वांची योग्यता सारखी नसते.

४. नेहमी नम्रतेने वागावे.

येथील शौर्य, सावधगिरी, योग्यता, नम्रता हे शब्द वस्तूंच्या ठिकाणच्या गुणांचा, धर्मांचा बोध करतात. म्हणून ज्या नावावरून वस्तूच्या ठिकाणचे गुण, दोष, भाव, धर्म यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात..

भाववाचक नामाचा आणखी एक पोटप्रकार आहे. त्यास क्रियावाचक किंवा धातुसाधित नाम असे म्हणतात. उदा. हसे, बोलणी, पेरणी, वाचन इ. हे शब्द धातूपासून बनलेले असतात. करता सामान्यनामे व विशेषणे यांना वेगवेगळे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार येतात.

Leave a Comment