आपण पाहिले की वाक्यामध्ये अनेक सार्थ शब्द असतात. शब्द अनेक असतात असे म्हटल्यावर त्यांचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे ठरते. त्याचा येथे विचार करू या. खालील वाक्ये पाहा :
१. मी गावाला गेलो.
२. पंतप्रधानांनी शहरांना भेटी दिल्या.
३.आम्ही चांगली पुस्तके विकत घेतली.
४. त्याने चांगले पुस्तक भेट दिले.
येथील जाड टाईपमधील शब्दांकडे जर बारकाईने पाहिले तर असे आढळेल की त्यांच्यात लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे काही बदल झालेले आहेत. हा जो बदल होतो त्यास व्याकरणात विकार असे म्हणतात. ज्या शब्दांमध्ये हे विकार होतात त्यांना सविकारी शब्द असे म्हणतात.
आता खालील वाक्ये पाहा :
१. राम आणि सीता वनवासास निघाली.
२. माझ्यासाठी जागा करून द्या.
३. पूरग्रस्तांसाठी स्वेच्छेने मदत करा.
४. कासव हळूहळू चालते.
५. गर्दीमुळे गाड्या हळूहळू जात होत्या.
येथील जाड अक्षरांचे शब्द पाहिल्यावर काय दिसते ? असे दिसेल की लिंग, वचन आणि पुरुषामुळे त्यांच्यात काहीही बदल झालेला नाही. अशा शब्दांत कोणताही विकार नसल्यामुळे त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात.
म्हणून शब्दांच्या प्रमुख दोन जाती होतात त्या, म्हणजे
१. सविकारी शब्द,
२. अविकारी शब्द
सविकारी शब्द : ज्या शब्दांमध्ये लिंग, वचन, पुरुष यांच्यामुळे बदल होतो त्यांना सविकारी किंवा सव्यय शब्द असे म्हणतात.
अविकारी शब्द : ज्या शब्दामध्ये लिंग, वचन, पुरुष यांच्यामुळे कोणताही बदल होत नाही त्यांना अविकारी किंवा अव्यय शब्द असे म्हणतात.
शब्दांच्या या प्रमुख दोन जातींचे आणखी प्रत्येकी चार चार पोटभेद तयार होतात ते असे :