पुढील परिच्छेद वाचा :
शैलेंद्राला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. शैलेंद्राने येथे आपला अभ्यास वेळेवर सुरू केला. शैलेंद्राला परीक्षेत चांगले गुण मिळाले. कॉलेजमधील विविध स्पर्धांत शैलेंद्राने भाग घेऊन खूप बक्षिसे मिळवली. शैलेंद्राच्या कामात काही मित्र पण मदत करतात. आता हा परिच्छेद वाचा.
शैलेंद्राला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्याने तेथे आपला अभ्यास वेळेवर सुरू केला. त्याला परीक्षेत चांगले गुण मिळाले. कॉलेजमधील विविध स्पर्धांत त्याने भाग घेऊन खूप बक्षिसे मिळवली. त्याच्या कामात काही मित्र पण मदत करतात.
वरील परिच्छेद वाचल्यावर हे लक्षात येईल की त्यात काही फरक आहे. पहिल्या परिच्छेदात शैलेंद्र शब्द खूप वेळा आला आहे. दुसऱ्या परिच्छेदात शैलेंद्र या शब्दासाठी त्याने, त्याला, त्याच्या अशा शब्दांचा उपयोग केला गेला आहे. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, केवळ तो, त्याने, त्याला, त्याच्या एवढेच
सांगितल्याने त्या शब्दांवरून निश्चित बोध होत नाही. तो म्हणजे कोण ? त्याला म्हणजे
कोणाला ? हे अगोदर स्पष्ट करावे लागते. शिवाय, हे पण सहज लक्षात येईल की, या
शब्दांचा वाक्यात उपयोग होताना त्यांच्यात विकार निर्माण होतो.
यावरून असे म्हणता येईल की, वाक्यात पूर्वी येऊन गेलेल्या एखाद्या नामाचा उच्चार सतत होऊ नये म्हणून त्या नामाबद्दल सोयीसाठी जो शब्द वापरतात त्याला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम हा विकारी शब्द आहे.
सर्वनामाचे प्रकार
१. सर्वनाम: सृष्टीमध्ये वक्त्याच्या दृष्टीने तीन भाग पाडलेले आहेत. जो बोलतो तो वक्ता, जो ऐकतो तो श्रोता आणि ज्याच्याविषयी बोलले जाते तो म्हणजे वक्ता व श्रोता सोडून अन्य होय.
याच वक्ता, श्रोता अन्य ला व्याकरणात पुरुष असे म्हणतात.
पुरुषाचे तीन प्रकार आहेत.
बोलणारा तो प्रथम पुरुष.
ज्याच्याबरोबर बोलावयाचे तो द्वितीय पुरुष. ज्याच्याबद्दल बोलावयाचे तो तृतीय पुरुष.
पुढील वाक्ये पाहा :
१. भाऊ म्हणाले, “मी कादंबरी लिहितो आहे.”
२. कपिल सुनीलला म्हणाला, “आम्ही क्रिकेट खेळणार आहोत.”
३. मधुकर म्हणाला, “तू गावाला केव्हा जाणार आहेस ?”
४. “तुम्ही आंगणात खेळा बघू.” मला त्रास होतो आहे.
५. आपण अचानक कसे आलात ?
६. तो जाऊन निरोप सांगेल.
७. आजच ते संध्याकाळी येणार आहेत असे दशरथ म्हणाला. वरील पहिल्या दोन वाक्यांत मी, आम्ही शब्द बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल आले आहेत.
म्हणून मी, आम्ही, प्रथमपुरुषवाचक सर्वनामे होत. तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या वाक्यात तू, तुम्ही, आपण हे शब्द ज्यांच्याबरोबर बोलावयाचे त्यांच्याबद्दल आले आहेत. म्हणून तू, तुम्ही, आपण ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे होत. शेवटच्या दोन वाक्यांत तो, ते शब्द स्वतः व दुसरा सोडून इतरांसाठी (तिसऱ्यासाठी) वापरले आहेत. म्हणून तो, ते शब्द तृतीय पुरुषवाचक सर्वनामे होत.
२. आदरार्थी सर्वनाम : “आपण पाहुणे म्हणून आजच्या समारंभास लाभलात हे आमचे भाग्य होय.” येथे पाहुणा एकच व्यक्ती आहे, पण त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपण शब्द वापरला आहे. म्हणून आपण हे आदरार्थी सर्वनाम होय.
३. दर्शक सर्वनाम:
१. हा मुलगा कोठे हरवला ?
२. ही सारसबाग होय.
३. तो पाहा रंकाळा तलाव.
४. ती पत्रपेटी नवीन लावली आहे.
येथील हा, ही, तो, ती या सर्वनामांवरून जवळच्या किंवा दूरच्या वस्तूचा निश्चित बोध होतो. म्हणून त्यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात.
दर्शक सर्वनाम: एकवचन : हा, ही, हे तो, ती, ते
अनेकवचन हे, ह्या, ही, ते, त्या, ती.
४. संबंधी सर्वनाम:
१. जो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता.
२. ज्याची करावी चाकरी त्याची खावी भाकरी.
येथे जो, ज्याची ही सर्वनामे आली आहेत. या सर्वनामांमुळे पुढील सर्वनामांशी (तो, त्याची) संबंध दाखवला जातो. म्हणून जो जे ही संबंधी सर्वनामे होत. संबंधी सर्वनामे : एकवचन : जो, जी, जे.
अनेकवचन: जे, ज्या, जी.
५. अनिश्चयवाचक सर्वनाम
१. हे काम कोणी का करेना.
२. बाहेरून कोणी आले आहे.
३. जे काही सांगेन ते करा.
४. काही लक्षात येत नाही.
येथील कोणी, काही ही सर्वनामे आहेत; परंतु या सर्वनामांवरून कोणत्याही निश्चित वस्तूचा बोध होत नाही, म्हणून यांना अनिश्चयवाचक सर्वनाम म्हणतात.
६. आत्मवाचक सर्वनाम:
१. आपण हे काम मुळीच करणार नाही.
२. त्याने आपणहूनच हे सांगितले.
येथील आपण हे सर्वनाम स्वत: बद्दल उल्लेख करताना आले आहे. म्हणून या ‘आपण’ ला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. लक्षात ठेवा की आदरार्थी ‘आपण’ सर्वनामापेक्षा हे आत्मवाचक ‘आपण’ सर्वनाम वेगळे आहे.
७. प्रश्नार्थक सर्वनाम पुढील वाक्ये पाहा
१. हे प्रदर्शन कोणी भरवले ?
२. त्या खेळाडूचे नाव काय आहे ?
३. मॅच पाहावयास कोण येणार आहे ? येथील कोणी, काय, कोण या सर्वनामांचा उपयोग प्रश्न करण्यासाठी केला गेलेला दिसेल. यावरून प्रश्न विचारण्यासाठी योजलेल्या सर्वनापास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात हे स्पष्ट होईल.