पुढील वर्णन वाचा :
“माझ्या गावाचे नाव कोल्हापूर आहे. त्याला कोणी करवीर नगरी असेही म्हणतात. करवीर हे एक तीर्थक्षेत्र आहे. येथे महालक्ष्मी देवीचे प्रसिद्ध देवालय आहे. देवीच्या दर्शनासाठी नेहमी लोक गर्दी करतात. महालक्ष्मीच्या मंदिराशिवाय पन्हाळा, विशाळगड ही , ऐतिहासिक स्थाने येथून जवळच आहेत. ”
येथे एका गावाबद्दल काही सांगितले आहे. यावरून असे लक्षात येईल की, आपण आपले विचार सर्वसाधारणपणे बोलून किंवा लिहून दाखवितो. म्हणून ‘आपल्या बोलण्यास किंवा लिहिण्यास भाषा असे म्हणतात. ”
भाषेतून आपण जे विचार व्यक्त करतो ते पूर्ण अर्थ प्रकट करतात. हा पूर्ण अर्थ पूर्ण वाक्यातून प्रकट होतो. सार्थक शब्दांच्या साहाय्याने वाक्य तयार होते व वाक्यांमुळे भाषा तयार होते.
पुढील वाक्ये पाहा:
१. वारा जोराने वाहत होता.
२. रशियाचे पंतप्रधान लवकरच भारत देशास भेट देणार आहेत.
३. जपानने झपाट्याने विकास साधला आहे.
४. क्रिकेट हा सर्व देशांत लोकप्रिय खेळ आहे.
वरील प्रत्येक वाक्य एक एक पूर्ण विचार प्रकट करीत आहे. त्यातून एक पूर्ण अर्थ सुद्धा व्यक्त होत आहे.
आता पुढील वर्णन पाहा :
१. पाऊस जोरात
२. झपाट्याने विकास
३. भारतात कालच सकाळीया वर्णनावरून कोणता बोध होतो ?
जरा विचार केला तर तेथे कोणताही पूर्ण अर्थ समजत नाही
यावरून असे म्हणता येईल की, आपल्या मनातील विचार पूर्ण अर्थाने प्रकट करणाऱ्या शब्दसमूहास वाक्य असे म्हणतात.
वाक्यात कमीत कमी दोन शब्द असतातच. फक्त त्यांनी पूर्ण अर्थ व्यक्त केला पाहिजे. उदा. मी झोपलो. मांजर पळाले.
जा, खा, पळ वगैरे सुद्धा वाक्ये म्हणता येतील; परंतु येथे कर्ता (तू) अदृश्य आहे म्हणून ते दोन शब्दच म्हणावे लागतील.